पुणे विभागातल्या रेल्वे धावणार १३० किमी वेगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:51+5:302021-09-03T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभागात धावणाऱ्या मालगाड्यांचा वेग हा ताशी ७० किलोमीटर आहे. प्रवासी गाडी ताशी ११० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभागात धावणाऱ्या मालगाड्यांचा वेग हा ताशी ७० किलोमीटर आहे. प्रवासी गाडी ताशी ११० किलोमीटर वेगाने धावते. ‘डबल डिस्टन्स सिग्नल’ या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर आणि रुळांची अन्य कामे झाल्यावर या गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे. तेव्हा मालगाडी ताशी १०० किमी, तर प्रवासी गाडी ताशी १३० किमी वेगाने धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास गतिमान होईल.
भारतीय रेल्वेत आता अत्याधुनिक सिग्नल प्रणालीचा वापर होत आहे. पुणे विभागात पहिल्यांदाच पुणे ते दौंड दरम्यान ‘डबल डिस्टन्स’ सिग्नल प्रणाली कार्यन्वित करण्यात आली. त्यामुळे रेल्वेचालकास आता दोन किलोमीटर आधीच पुढचा सिग्नल काय असेल हे समजेल. त्यानुसार गाडीचा वेग कमी करायचा की जास्त, हे त्याला ठरविता येईल. यामुळे गाड्यांच्या वेगात सातत्य ठेवण्यास मदत होणार आहे.
‘ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नल’ यंत्रणेनंतर आता पुणे विभागात ‘डबल डिस्टन्स सिग्नल’ प्रणाली सुरू झाली आहे. सामान्यपणे लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचा वापर ‘सिग्नलिंग’साठी केला जातो. डबल डिस्टन्स सिग्नलमध्ये केवळ पिवळा आणि हिरव्या रंगाचा वापर होतो. त्यामुळे रेल्वेचालकास किमान दोन किलोमीटर आधी कळेल की त्याला पुढे कोणता सिग्नल मिळेल. त्यावरून तो गाडी थांबवायचे किंवा गती कमी करायची की नाही हे तो आधीच ठरवेल. पुणे ते दौंड रेल्वे मार्गावर ही सिग्नल प्रणाली यशस्वी झाल्यानंतर अन्य विभागात देखील ती कार्यन्वित केली जाईल.
चौकट
‘डबल डिस्टन्स सिग्नल’ असे करेल काम
सध्याच्या सिग्नल प्रणालीनुसार इंजिन डब्यात बसलेला सहायक रेल्वे चालक सिग्नलवर लक्ष ठेवून त्याची माहिती मुख्य चालकास देत असतो. पुढचा सिग्नल कोणता असणार याची दोघांना माहिती नसते. पुढे मार्ग मोकळा आहे की नाही हे कळण्यासाठी गाडीची गती कमी करणे किंवा सिग्नल मिळेपर्यंत थांबून राहणे हे दोन पर्याय चालकापुढे असतात. आता मात्र चालकाला पुढचा सिग्नल दोन किलोमीटर अंतरावर असतानाच कळणार आहे. त्यामुळे गाडीच्या गतीसंदर्भातला निर्णय चालकाला घेता येईल.