रेल्वे मालधक्का बंद होऊ देणार नाही : वंदना चव्हाण; पियूष गोयल यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 07:30 PM2017-12-23T19:30:24+5:302017-12-23T19:33:07+5:30
चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
पुणे : रेल्वे मालधक्का ही पुणे शहराची एक वेगळी ओळख आहे. तिथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांशी एका शब्दाचीही चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्याच बरोबर रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळासाठीही जागाही उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील रेल्वे मालधक्का प्रसिद्ध आहे. तिथे माल उतरवणे, चढवणे अशी कामे होतात. कित्येक वर्षांपासून तिथे अनेकजण काम करीत आहेत. रेल्वेचीही ती एक गरज आहे. असे असताना हा मालधक्का बंद करण्याचा निर्णय कोणाशीही चर्चा न करता घेण्यात आला. हमाल, कामगार यांच्याबरोबर रेल्वे प्रशासनाने चर्चा करणे आवश्यक होते. या निर्णयाचा विरोध म्हणून हमालांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आंदोलन केले तर त्यांची दखल घेण्याचे सौजन्यही रेल्वे प्रशासनाने दाखवलेले नाही अशी टीका चव्हाण यांनी केली.
रेल्वेमधून स्थानकात प्रवासी उतरले की रेल्वेची जबाबदारी संपली असे होत नाही. प्रवाशांना, त्यातही महिला प्रवाशांना रेल्वेमधून उतरल्यानंतर सुरक्षितपणे घरी जाता आले पाहिजे. त्यासाठी कूल कॅब हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. अशा कूल कॅब्जना वाहनतळ उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला आहे. प्रशासनाचे हे दोन्ही निर्णय अयोग्य असून त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार चव्हाण यांनी गोयल यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.