उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा 'शून्य'चा खेळ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:01+5:302021-06-20T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासन पुण्यासह देशातील विविध स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करीत आहे. पण यंदाही रेल्वेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासन पुण्यासह देशातील विविध स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करीत आहे. पण यंदाही रेल्वेने चालाखी केली. गाड्यांच्या सुरुवातीला 'शून्य' क्रमांक देउन त्यांनी गाड्यांना विशेष रेल्वेचा दर्जा दिला. परिणामी यंदाही प्रवाशांना सवलतीपासून मुकावे लागणार आहे. रेल्वेने उत्पन्न वाढीसाठी ही शक्कल लढवली आहे. मात्र याचा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या रेल्वे प्रशासन आता पुन्हा सुरू करीत आहे. यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या यशवंतपूर-जयपूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बंगळुरू, गांधीधाम-बेंगळुरू, अजमेर- म्हैसूर, मुंबई-नागरकोईल आदी विशेष गाड्या २६ व २७ जूनपासून सुरू करीत आहे. या गाड्यांनादेखील विशेषचा दर्जा दिल्याने याला तिकीट दरात असलेल्या सर्व सवलती पुन्हा रद्द झाल्या आहेत.
--------------
आधी कोविड स्पेशल आता फेस्टिवल :
रेल्वेने कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड १९ स्पेशल दर्जाची रेल्वे देशभर चालविल्या. यानंतर हॉलिडे स्पेशल, आणि आता पुन्हा फेस्टिवल स्पेशल म्हणून सुरू करीत आहे. यात देखील प्रवाशांच्या सर्व सवलती रद्द झाल्या आहेत.
------------------
जवळपास ५३ प्रकारच्या सवलती /
रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशांना रेल्वे तिकीट दरात जवळपास ५३ प्रकारच्या सवलती देते. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांकरीता अर्धे तिकीट, अधिस्वीकृती धारक पत्रकार, दिव्यांग, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती, अंध व्यक्ती, भारत सरकारने दिलेले पुरस्कारप्राप्त व्यक्ती आदी घटकांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासात २५ ते ७५ टक्के तर काही घटकांना १०० टक्के सवलत दिली जाते. या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांना पूर्ण तिकीट दराने तिकीट काढावे लागते.
----------------
रेल्वे प्रशासनाने आता विशेष दर्जाच्या रेल्वे बंद करून पूर्वीसारख्या सामान्य दर्जाचे रेल्वे सुरू करायला हवी. यातून रेल्वेचा जरी फायदा होत असला तरीही सामान्य प्रवासी मात्र विनाकारण भरडला जात आहे. रेल्वेने आता फायद्याचा विचार न करता प्रवाशाचा विचार करावा.
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे
--------------------
सध्या विशेष दर्जाच्या रेल्वे धावत आहे. त्यामुळे त्या रेल्वेला सवलती रद्द केल्या आहेत. जेव्हा सामान्य रेल्वे धावतील तेव्हा सवलती पुन्हा दिल्या जातील. रेल्वे बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल.
-ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई