पावसाची बारा जिल्ह्यांत दडी!
By admin | Published: July 12, 2017 04:12 AM2017-07-12T04:12:52+5:302017-07-12T04:12:52+5:30
राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून त्यात विदर्भ, खान्देशातील ९ जिल्हे तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २६ ते ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे़ याशिवाय १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून केवळ १० जिल्ह्यात सरासरीऐवढा अगर त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे़
राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान काही मोजके दिवस सोडल्यास पावसाने दडी मारली आहे़ विशेषत: विदर्भाला त्याचा अधिक फटका बसला आहे़ मराठवाड्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती काही प्रमाणात चांगली आहे़ पण, गेल्या १० दिवसांपासून तेथेही पाऊस जवळपास झालेला नाही़
विदर्भ व खानदेशातील धुळे -२८, जळगाव -२६, अमरावती -४२, नागपूर -३१, भंडारा -३५, गोंदिया -३८, अकोला -२६, चंद्रपूर -३७, गडचिरोली -२९, तर मराठवाड्यातील परभणी -२७, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली -३६ आणि कोल्हापूर -२७ टक्के कमी पाऊस झाला आहे़
राज्यातील १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ कोकणात पाऊस होत असला तरी जेवढा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे़ सिंधुदुर्ग -१५, रत्नागिरी -७, सातारा -१६, औरंगाबाद -१६, जालना -४, नांदेड -१२, यवतमाळ -१९, वर्धा -१, बुलढाणा -५, मुंबई -२९, वाशिम -१०, हिंगोली -७ आणि नंदूरबार -९ टक्के पाऊस कमी झाला आहे़
राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे सरासरीपेक्षा ७४ टक्के अधिक झाला असून नगर ३०, नाशिक ३०, पालघर ३९, ठाणे २५, पुणे २६, उस्मानाबाद ४६, रायगड ५, लातूर ९, बीड ३ टक्के जादा पाऊस झाला आहे़
राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक ठरु शकते़
>तीन दिवसांत येणार पाऊस
दडी मारुन बसलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ उत्तर प्रदेश, बिहार परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस पडत आहे़
गेल्या २४ तासांत राज्यात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ साताऱ्यात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी झाले होते.
सध्या उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे़ मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये ३५ टक्के आणि आॅगस्टमध्ये ३५ टक्के पाऊस पडत असतो़ राज्याच्या दृष्टीने गेला आठवड्यात पावसाने ताण दिला आहे़ शेतीच्या दृष्टीने तो प्रतिकुल ठरला आहे़ सरासरी पाऊस पडला तरी त्याचे वितरण महत्त्वाचे असते़ त्यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात सध्या प्रतिकुल परिस्थिती आहे़ आणखी तीन दिवसांनंतर राज्यात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे़
-डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ञ