Rain Alert In Maharashtra: राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 12:42 PM2021-11-14T12:42:27+5:302021-11-14T12:42:35+5:30
दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे
पुणे : दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण अंदमान समुद्रावर तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रातील तीव्रता १५ नोव्हेंबरनंतर वाढणार असून, १८ नोव्हेंबरच्या सुमारास ते आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला आहे. परिणामी राज्यातील बहुतांश ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. १६ व १७ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात हलक्या पावसाचा अंदाज
पुण्यात शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान ३१.८ आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवर गेले आहे. रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.