जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, शेतकरीराजा आनंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:41+5:302021-08-15T04:13:41+5:30
-----------//- खरीप पिके वाढीला : शेतकरी राजा आनंदात लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेरण्यांनंतर गायब झालेला पाऊस परतून आल्याने ...
-----------//-
खरीप पिके वाढीला : शेतकरी राजा आनंदात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेरण्यांनंतर गायब झालेला पाऊस परतून आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदात आहे. सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला असून पिके वाढीला लागली आहेत.
जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र १ लाख ८४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ७३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरिपाची पेरणी झाल्यावर पावसाने बराच ताण दिला. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. भात, सोयाबीन, मका, बाजरी ही खरीपातील जिल्ह्यामधील प्रमुख पिके आहेत. पावसाअभावी पेरणी वाया गेली तर नुकसान होते. दुबार पेर करावी लागते.
भाताची रोपेवाटिकेत असतानाच पावसाने ओढ दिली. मात्र आता ही चिंता मिटली आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. उगवण झालेल्या रोपांना हवा होता त्यावेळीच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे रोपे आता वाढीला लागली आहेत. खताची मात्रा देण्यासाठी शेतकरी आता तयारी करत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी मका, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही नगदी पिके आहेत. पाऊस मिळाला की त्यांची वाढ जोमाने होते. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. पाऊस, हवामान असेच राहिले तर यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असा अंदाज जिल्ह्यात दौऱ्यावर असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रमुख पिकांचे पेरणी क्षेत्र
मका: १७८७२ हेक्टर
सोयाबीन: ३१८७५
भात- ५३२०६
बाजरी- ३३९४९
खरिपाच्या पिकांवर शेतकऱ्यांची वर्षभराची मदार असते. पाऊस लांबल्याने हंगाम धोक्यात येतो की काय अशी शंका निर्माण झाली होती. सुदैवाने पाऊस वेळेवर सुरू झाला व धोका टळला.
- ज्ञानेश्वर बोटे- जिल्हा कृषी अधीक्षक