माऊली अन् तुकोबांच्या स्वागताला वरूणराजाची हजेरी ! दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल होणार
By श्रीकिशन काळे | Published: June 30, 2024 01:14 PM2024-06-30T13:14:14+5:302024-06-30T13:15:48+5:30
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत असून, तत्पूर्वीच त्यांचे स्वागत वरूणराजाने जलवृष्टीच्या रूपाने केली
पुणे: गेल्या काही दिवसांपासनू पुणे शहरात पावसाने ओढ दिली होती. कधी तरी भुरभुरू यायची. पण पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला आणि वरूणराजाही प्रसन्न होऊन बरसू लागला. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत असून, तत्पूर्वीच त्यांचे स्वागत वरूणराजाने जलवृष्टीच्या रूपाने केले आहे.
भारतीय हवामान विभागानूसार गेल्या आठवड्यात पावसाचा खंड होता. पण जूनअखेरीस पुन्हा पावसाला सुरवात होईल, असा अंदाज दिला होता. पालखी सोहळा पुण्यात आल्यावर वरूणराजाही बरसणार असे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. तो अंदाज खरा ठरला आहे. सकाळपासूनच आकाश भरून आले असून, हलक्या ते मध्यम पावसाला सुरवात झाली आहे. पालख्यांसमोरील दिंड्या पुण्यनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या स्वागताला वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकर भक्तीरसात आणि जलरसात न्हाऊन निघत आहेत. पुढील दोन दिवस घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला असून, पुणे शहरामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.