पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा
By श्रीकिशन काळे | Published: May 9, 2024 03:45 PM2024-05-09T15:45:28+5:302024-05-09T15:47:03+5:30
उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे
पुणे : राज्यामधील तापमानाचा पारा चढला असून, पुढील तीन-चार दिवस सायंकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याची माहिती ‘आयएमडी’चे माजी हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. पुण्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून, सिंहगड रस्ता, धायरी आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शहराच्या इतर भागातही वादळी वारे सुटले असून थोड्याच वेळात पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये आज (दि.९) पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, जालना, यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे.
तर १० मे रोजी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. तसेच ११ ते १३ मे दरम्यानही हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.