Pune Heavy Rain: पुण्यात पावसाची सुट्टी; पूरही ओसरला, आता रोगराईला निमंत्रण?
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 26, 2024 06:47 PM2024-07-26T18:47:00+5:302024-07-26T18:48:44+5:30
पुण्यातील पुरामुळे या वातावरणात लेप्टाेस्पायराेसिस, कावीळ, टायफाॅईड, काॅलरा असे जलजन्य आजार बळावण्याचा धाेका निर्माण झाला आहे
पुणे: पुण्यात पुरामुळे माेठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी किनाऱ्यावरील साडेचारशे घरांमध्ये पाणी शिरले. त्याबराेबरच गाळ, चिखलही शिरला. आता पावसाने उघडीप दिल्याने पूरही ओसरला आहे. आज तर पावसानेही दांडी मारल्याचे दिसून आले आहे. परंतु ज्या परिसरात पुराचे पाणी शिरले तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. अशा वातावरणात लेप्टाेस्पायराेसिस, कावीळ, टायफाॅईड, काॅलरा असे जलजन्य आजार बळावण्याचा धाेका निर्माण झाला आहे. यामुळे नदीकिनाऱ्यावरील पूरग्रस्त भागामध्ये आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
पुराचे पाणी अनेक घरेे, सोसायट्यांच्या पार्किंग, दुकानामध्ये शिरल्याने या परिसरात चिखल झालेला आहे. तसेच काही ठिकाणी पाणी साचून राहिल्यास आणि त्यामध्ये जर लेप्टाेस्पायराेसिसचे जीवाणू उंदीर, मांजर अशा प्राण्यांच्या विष्ठेद्वारे त्यामध्ये मिसळल्यास त्याचा संसर्ग माणसांमध्येही हाेताे. अशा दूषित पाण्याचा जखमेशी संपर्क आल्यास लेप्टाेची लागण हाेते. हा पुराचा सर्वांत माेठा धाेका आहे. त्यामुळे अशा पाण्यात अनवाणी किंवा जखम असल्यास न फिरणे आणि लेप्टाेप्रतिबंधात्मक गाेळ्या येथील रहिवाशांना देणे आवश्यक आहे.
इतकेच नव्हे तर निवासी साेसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या तयार केलेल्या असतात. या टाक्यांमध्ये गाळ, चिखल गेल्याने या नागरिकांच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या टाक्या याेग्यरितीने स्वच्छ करणे हे मोठे आव्हान आहे. टाक्यांची स्वच्छता याेग्यरितीने न झाल्यास पाणी दूषित हाेऊ शकते आणि असे पाणी पिण्यामध्ये आल्यास त्यापासून कावीळ, काॅलरा, टायफाॅईड असे साथीचे आजार पसरू शकतात. त्यामुळे या परिसरात जलजन्य आजारांचा धाेका वाढला आहे. त्याबाबत या परिसरातील नागरिकांची जनजागृती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
ओलाव्यामुळे संसर्गाचा वाढताे वेग
जेथे ओलसरपणा आहे तेथे जीवाणू, विषाणूंची वाढ वेगाने हाेते. काेराेनाच्या काळात याचा अनुभव घेतलेला आहे. सध्याच्या काळात ऊन पडत नाही. त्यामुळे ओलावा अधिक काळ टिकून राहताे. अशा ठिकाणी राेगट वातावरण तयार हाेऊ शकते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याचा धाेका निर्माण हाेताे.
भिंतीवरील ओलाव्यामुळेही श्वसनविकारांचा धाेका
घरात पाणी शिरल्याने भिंतीवर त्याचा परिणाम जास्त दिसून येताे. येथे बुरशीचे प्रमाण वाढते. ती बुरशी श्वसनावाटे फुप्फुसांच्या आत गेल्यावर ॲलर्जी, श्वसनविकार, खाेकला याचाही धाेका वाढू शकताे. त्यामुळे, घराच्या आतून स्वच्छता करणे, पेंटिंग करणे हे देखील गरजेचे आहे.
आमच्या परिसरात ग्राउंड फ्लोअरला चिखल आणि गाळ साचला आहे. पिण्याच्या पाण्यांमधील टाक्यांमध्ये गाळ गेला आहे. तसेच ती स्वच्छता करणे हे आव्हान आहे. यामुळे साथीचे आजार वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि स्वच्छतेसाठी मदत करावी. - सचिन दाणी, विठ्ठल नगर कॉलनी, सिंहगड रोड
ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठलेले आहे त्या ठिकाणी आराेग्य कर्मचाऱ्यांमार्फत औषध फवारणी करण्यात येणार आहे. घनकचरा विभागाकडून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येईल. लेप्टो रुग्णाचा अद्याप काही अहवाल आलेला नाही. परंतु, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या सर्व मेडिकल ऑफिसरना पत्र पाठवून माहिती देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी उघड्या जखमेद्वारे पाण्यात फिरू नये. तसेच जर अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात गेले तर पाणी उकळून, गाळून प्यावे. - डाॅ. सूर्यकांत देवकर, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा