पावसाने शहराला दिलासा
By admin | Published: June 2, 2017 02:33 AM2017-06-02T02:33:03+5:302017-06-02T02:33:03+5:30
गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाच्या हलक्या सरीने दिलासा दिला़
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाच्या हलक्या सरीने दिलासा दिला़ शहराच्या बहुतांशी भागांत पाऊस झाला असून, या हलक्या पावसानंतर शहराच्या अनेक भागांत पाण्याची तळी झाल्याचे दिसून
आले़ त्यातून महापालिकेची नालेसफाई वरवरची असल्याचे दिसून आले़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेधशाळेत १़८ मिमी पावसाची नोंद झाली होती़
गेल्या २ दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे़ केरळमध्ये मॉन्सून आला तरी पुण्यात पूर्वमोसमी पावसाच्या एक -दोन सरीनंतर पत्ता नव्हता़ शुक्रवारी सकाळपासूनच उकाडा जाणवू लागला होता़ दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली़ सायंकाळी साडेपाचनंतर शहराच्या विविध
भागांत पावसाच्या हलक्या सरी येऊ लागल्या़ त्यामुळे कामावरून सुटलेल्यांची एकच धांदल उडाली़ अनेकांनी या पावसात भिजत जाण्याचा आनंद लुटला़
शहरातील मध्य भाग, पेठा, येरवडा, सहकारनगर, बिबवेवाडी, धायरी, दत्तनगर, आंबेगाव, हडपसर, हिंजवडी, धनकवडी परिसरात चांगला पाऊस झाला़ दत्तनगर येथील भुयारी मार्गात थोड्याशा पावसाने पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती़ या पावसाने जंगली महाराज रोडवर काम सुरु आहे़ पावसाने येथील माती रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी चिखल झाला होता़ शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती़
येरवडा जेल परिसरात अंधारात
येरवडा येथील कारागृहाच्या परिसरात सकाळी १० वाजता वीजपुरवठा खंडित झाला होता़ सायंकाळी तो परत पूर्ववत होणे अपेक्षित होते़ पण, रात्री १० वाजेपर्यंत अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला नव्हता़