पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:05 PM2021-07-05T22:05:09+5:302021-07-05T22:06:37+5:30
पुढील ३ दिवस आकाश ढगाळ राहणार; १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता...
पुणे : गेले काही दिवस नुसते आकाशात ढग दाटून येत होते. आता जोराचा पाऊस होणार असले वाटत असतानाच एखादी रस्ता ओला करुन जाणारी सर येऊन पाऊस गायब झाल्याचे दृश्य गेले आठवडाभर होते. तब्बल एक आठवड्यानंतर शहराच्या मध्य वस्तीत सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, लोहगाव येथे ०.५ मिमी पाऊस पडला.
गेल्या सोमवारी २८ जून रोजी शहरात १८.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आठवड्याभरात केवळ एकदाच भुरभुर पाऊस झाला होता.
शहरात सकाळपासूनच उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल, असे वाटत असतानाच दुपारनंतर आकाश ढगांनी गर्दी केली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी येण्यास सुरुवात झाली. परंतु, हा पाऊस शहराच्या पश्चिम भागात तसेच शिवाजीनगर, गोखलेनगर, कॅम्प, कल्याणीनगर परिसरात पावसाचा जोर होता. लोहगाव परिसरात हलकी सर पडली. कात्रज परिसरात काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला.
१ जूनपासून ५ जुलैपर्यंत शिवाजीनगर येथे १५२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा ती ३३.८ मिमीने कमी आहे. त्याचवेळी लोहगाव येथे २१५.८ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ९१.८ मिमीने अधिक आहे.
शहरात पुढील ३ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी हलक्या पावसाची सर येण्याची शक्यता आहे. १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.