तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 08:39 PM2019-06-29T20:39:08+5:302019-06-29T20:40:01+5:30
देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे.
तेजस टवलारकर
यवत : ‘ग्यानबा- तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयजयकार करत, वारकऱ्यांच्या अलोट उत्साहात शनिवारी तुकोबांची पालखी वरूणराजाच्या साक्षीने लोणी काळभोरहून यवतकडे मार्गस्थ झाली. लोणी काळभोर ते यवत हा सुमारे २८ किलोमीटरचे अंतर आज सहजरित्या पार केले. दौंड तालुक्यात प्रवेश करताना ग्रामस्थांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले. पालखीचा आज यवतला मुक्काम असून, उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे. वारकऱ्यांना आता केवळ पंढरीच्या दर्शनाचीच आस आहे. तुकोबांची पालखीचा शुक्रवारचा मुक्काम लोणी काळभोर येथे होता. मंगळवारी ही पालखी लोणीहून यवतकडे रवाना झाली, याच ठिकाणी या पालखीचा आजचा मुक्काम आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ- मृदंग घेऊन वारकरी हरिनामाचा जयघोष करत, तहानभूक हरवून वारकरी दिंड्या- पताका नाचवत पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत.
लोणी काळभोर येथून निघालेली पालखीचा सकाळचा विसावा उरळीकांचन येथे झाला. पालखीच्या स्वागतासाठी सरपंच ग्रामस्थ मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. पावसाच्या धारा अंगावर झेलत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने लोणी काळभोर ते यवत हा मार्ग पार केला. दरम्यान, खासदार संभाजी राजे छत्रपती, कोल्हापूर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.
पालखी सोहळ्याने भोरीभडक मार्गे दौंड तालुक्यात प्रवेश केला. तुतारी वाजून रांगोळ्या काढून पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल, कांचन कुल व भोरीभडक गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. येथून पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली.
........
वारीला जागतिक वारसा मिळावा
पालखी सोहळा जागतिक स्तरावर नेण्याची आपली जबाबदारी आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य जगाला कळले पाहिजे. पालखी सोहळ्याची किल्ले रायगड प्रमाणे जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. - संभाजी राजे छत्रपती
..................
भाकरी पिठलं ऐवजी फराळ
यवत येथे दरवर्षी भाकरी पिठलंचे जेवण पालखी सोहळ्याला दिले जाते. परंतु आज एकादशी असल्यामुळे पिठलं भाकरीच्या जेवणाला फाटा देऊन फळांचे, खिचडीचे वाटप करण्यात आले. रविवारी उपवास सोडण्याच्या वेळी जेवणाचा आस्वाद वारकºयांना देण्यात येणार आहे. पालखी सोहळा रविवारी सकाळी वरखंडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.