दौंड, बारामतीत अवकाळी पावसाचा फेरा; द्राक्षबागा, गहू आणि ज्वारीच्या पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:45 PM2020-03-02T13:45:35+5:302020-03-02T14:04:52+5:30
भर उन्हाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ
पुणे : दौंड, बारामती तालुक्यांच्या काही भागात रविवारी दुपारी अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याने हजेरी लावली. थोड्या वेळ आलेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला असला तरी काही वेळातच द्राक्षबागा, गहू आणि ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. कापणी पिकावर ताडपत्र्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.
बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरासह काही भागात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. पावसाने काटेवाडी कन्हेरी पिंपळी लिमटेक परिसरातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला. या अचानक आलेल्या पवासामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जपलेल्या द्राक्षबागा काढणीच्या टप्प्यात आहेत. तसेच काही बागांचे मार्केटिंग सुरु झाले आहे. वाऱ्याने गहू, मका, कडवळ आदी चारापिके जमीनदोस्त झाली आहेत. ढेकळवाडी येथे गहूपीक जमीनदोस्त झाली आहे. अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे सर्वांत मोठा फटका बसला. त्यामुळे आधीच विविध कारणांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर निसर्ग नाराज झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. बारामती परिसरातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. उघड्यावर काढून पडलेला कांदा भिजून खराब झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गहू पीक हातातोंडाशी आल्याने ते घरी न येताच पावसामुळे जाण्याची दाट शक्यता आहे. इंदापूर तालुक्यातही भवानीनगर, सपकळवाडी, सणसर, बोरी, काझड, निंबोडी परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. बोरी परिसरात निर्यातक्षम द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांनाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
...........
रावणगावातही पावसाची हजेरी
रावणगाव (ता. दौंड) परिसरात रविवारी ( दि. २) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपूर्ण दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी ढग दाटून आले आणि काही प्रमाणात वारा सुटला. त्यानंतर काही मिनिटे पाऊस झाला. पावसामुळे शेतकºयांची काढलेली पिके झाकण्यासाठी तसेच कागद खरेदी करण्यासाठी धांदल उडाली.
.............
या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू, ज्वारी तसेच द्राक्ष, हरभरा या पिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच आंबा मोहोर गळून पडण्याची अथवा त्याच्यावर मावा रोग पडण्याची शक्यता आहे. तर हा पाऊस भुईमूग, मूग अशा पिकांसाठी पोषक ठरू शकतो.
.......
मेखळी परिसरात गव्हाचे नुकसान
मेखळी : मेखळी (ता. बारामती) येथे रविवारी (दि. १) झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील गहू, ज्वारी, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील पिके कॅनॉलला आलेल्या पाण्याने भिजवल्यामुळे गहू व इतर पिकांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले व पिके जमीनदोस्त झाली.
..........
निरवांगी : अचानक झालेल्या पावसामुळे निरवांगी मानेवस्ती (ता. इंदापूर) या ठिकाणी गहू व कारले व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. निरवांगी मानेवस्ती परिसरात अचानक झालेल्या वादळी पावसामुळे गहू व कारले व इतर पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेल्या काही पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करावी व पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.