Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार
By श्रीकिशन काळे | Published: May 19, 2024 04:49 PM2024-05-19T16:49:45+5:302024-05-19T16:51:18+5:30
दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल
पुणे: ज्याची आतुरतेने शेतकरी राजा वाट पाहतो, त्या मॉन्सूनचे आगमन रविवारी (दि.१९) अंदमानात झाले अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच या मॉन्सूनला कसलाही अडथळा येणार नसल्याने तो वेगाने पुढे सरकणार आहे. हवेचे दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत ठरत असून, मॉन्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल, अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे.
सध्या नैऋत्य मॉन्सून मालदीव, दक्षिण बंगालचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. वातावरणाच्या खालच्या स्तरातील द्रोणीका रेषा उत्तर प्रदेश ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागांवर चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. कोकणात रविवारी (दि.१९) व पुढील दोन दिवस बऱ्याच जिल्ह्यांत वातावरण दमट व उष्ण असेल, तर रत्नागिरीत २० ते २३ मे पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ मे ला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज रविवारी (दि.१९) व २१ व २२ मे रोजी यलो अलर्ट दिला. मराठवाड्यात २२ मे पर्यंत बऱ्याच जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे. दरम्यान, पुणे व परिसरात २१ ते २५ मे पर्यंत आकाश निरभ्र राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे.
मॉन्सूनचा प्रवास !
सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हे तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत वाढेल. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. मॉन्सून श्रीलंकेवर २६ मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल, असा अंदाज देण्यात आला आहे.