परतीच्या पावसाचा धुडगूस; रावडे गावात गोठा कोसळला, ३ गुरे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:36 PM2017-10-17T13:36:54+5:302017-10-17T13:43:13+5:30
रावडे गावातील हुलावळेवाडी येथे जोरदार पावसाने सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला. गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली.
भूगाव : गेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुडगूस घातला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, जोरदार वादळवारा यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याबरोबरच घराचे पत्रे व कौले फुटण्याच्या घटना झाल्या आहेत.
मुळशी तालुक्यातील रावडे गावातील हुलावळेवाडी येथे जोरदार पावसाने सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला. गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली. रावडे (हुलावळेवाडी) येथील मधूकर हुलावळे यांचा घरामागेच गुरांचा गोठा आहे. जोरदार पाऊस असल्याने सर्वजण घरामध्येच बसले होते. गोठ्याजवळच थांबलेल्या गावातील ओंकार हुलावळे, ऋषिकेश हुलावळे, वैभव हुलावळे, कुनाल हुलावळे या तरुणांना गोठा पडत असल्याचे जाणवले. गोठ्यात तीन म्हशीच्या बांधलेल्या होत्या. गावातीलच विठ्ठल हुलावळे, नवनाथ हुलावळे, किरण हुलावळे यांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यात जाऊन जनावरे सोडली. परंतु जनावरे सोडताक्षणी गोठा अंगावर कोसळला. ते ढिगार्यात अडकून पडले होते. त्यांच्या व जनावारांच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदतीकरीता धावून आले. त्यांनी पत्रा फोडुन या तरुणांसह गोठ्यातील तीन गुरांना बाहेर काढले.
सुदैवाने तरुणांना यात काहीच जखम झाली नाही, परंतु गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच गोठा कोसळल्याने हुलावळे यांच्यासमोर गुरांना ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.