भातपिकाला पावसाने जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:16 AM2018-10-04T00:16:53+5:302018-10-04T00:17:18+5:30
पंधरवड्यानंतर पुनरागमन : बळीराजा आनंदी
भोर : सुमारे १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भोर तालुक्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला. भातपिकाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. भाताची ५० हेक्टरवर रोपवाटिका करून सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भातखाचरातील पाणी आटले होते. परिणामी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता जाणवून वाढीवर विपरीत परिणाम होत होता.
पिकावर विषाणूजन्य करपा व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात इंद्रायणी, बासमती, फुले समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणी गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. सध्या भात पोसण्याची वेळ असताना पावसाअभावी डोंगर उतारावरील झरे आटले, तसेच ओढ्या, नाल्यांचे पाणीही आटले होते. त्यामुळे भातावर काही ठिकाणी जिवाणूजन्य करपा व काही भागात विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणे भरण्यास अडचण होणार होती.
अचानक पावसाने मारली दडी
तालुक्यात भाताची ७५०० हेक्टरवर लागवड झाली असून त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली होती. भाताचे पिक जोमात होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारली होती. पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवत होते.