Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: November 12, 2024 01:57 PM2024-11-12T13:57:56+5:302024-11-12T13:58:26+5:30
सद्यस्थितीत गारठा जाणवत असला तरी राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
पुणे : सध्या राज्यामध्ये आता बहुतांश भागामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. दुपारी ऊन पडत असले तरी हवेत गारठा आहे. राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुण्यात किमान तापमान १५ अंशावर असून, थंडीने पुणेकरांना आल्हाददायक वाटत आहे.
राज्यातील हवामान कोरडे आहे, पण गुरूवारपासून (दि.१४) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१५) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमान १४ अंशावर नोंदवले गेले आहे. त्यानंतर पुण्यातच सर्वात कमी तापमान आहे. त्यामुळे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला जाणवत आहे. उर्वरित राज्यात मात्र अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात किमान तापमान १७ अंशांवर तर कोकणात १९ अंशांवर नोंदवले जात आहे. विदर्भात १६ ते २० अंशाच्या दरम्यान किमान तापमान आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी अजून तरी पडलेली नाही.
दरम्यान, पुढील चोवीस तासात नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमी दाब क्षेत्र तामिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाची हजेरी लागेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी पुण्यासह काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या दक्षिण-पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि त्याच्या पश्चिमेकडे हालचालीमुळे ओलावा निर्माण होत आहे. ओलावा आणि ढगाळ वातावरण वाढल्यामुळे किमान तापमान/रात्रीचे तापमान थोडेफार वाढण्याची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे