पुण्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 05:11 PM2021-04-12T17:11:59+5:302021-04-12T17:15:50+5:30
उपनगरात पावसाच्या सरींची जोरदार हजेरी...
पुणे : पुणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत होता. तसेच हवामान विभागाने पावसाची शक्यता देखील वर्तवली होती. सोमवारी दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील बिबवेवाडी,कोथरुड,कर्वेनगर,सिंहगड रस्ता,वानवडी, वारजे माळवाडी या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली. उद्या गुढी पाडव्याचा सण असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेले पुणेकरांची वरूणराजाच्या हजेरीने चांगलीच तारांबळ उडाली.
पुणे शहरात पुढील ६ दिवस आकाश ढगाळ राहून सायंकाळनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविली होती. शनिवारी दुपारी ४ नंतर शहराच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर गर्दी नसल्याने लोकांची धावपळ झाली नाही. अनेकांनी या पावसाचा घरात बसूनच आनंद लुटला.
विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्यासह पुढील ४ दिवस पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
.........