Monsoon: पाऊस आला रे...! मॉन्सूनचे राज्यात आगमन; कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात हजेरी
By श्रीकिशन काळे | Published: June 11, 2023 02:02 PM2023-06-11T14:02:04+5:302023-06-11T14:03:41+5:30
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गती
पुणे : सध्या मान्सूनने केरळच्या संपूर्ण भागात हजेरी लावली असून तामिळनाडूचा भरपूर भागही व्यापला आहे. आता मॉन्सूनचे आज (दि.११) महाराष्ट्रातही आगमन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागही नैऋत्य मॉन्सूनने व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिलेली आहे. त्यामुळे मॉन्सून महाराष्ट्रातही पोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून काही काळ जाईल. तूर्त कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात त्याने हजेरी लावली आहे. खरंतर अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाला मजबूती दिली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती सुरू केली.
मॉन्सूनने गुरुवारी (दि.८) केरळमध्ये हजेरी लावली.तर शनिवारी (दि.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली. आता हा मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर दुपारी काही काळ निरभ्र आकाश होते, तर काळे ढगही पहायला मिळाले. सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊ शकते.