आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:13 IST2024-05-10T16:13:15+5:302024-05-10T16:13:31+5:30
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाचा मुहूर्त मोठा असल्याने अनेक मंगल कार्यालयात, गावांमध्ये वऱ्हाडी मंडळींची धावपळ

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ गावामध्ये तसेच अवसरी खुर्द, अवसरी बुद्रूक, निरगुडसर गावडेवाडी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात वारे सुटले होते. पावसाचे वातावरण दिसत असल्याने शेतकऱ्यांची काही वेळ एकच धांदल उडाली होती. शेतात काढलेली उन्हाळी बाजरी, कांदा पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली.
आज दिवसभर हवेत मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने दुपारी तीन नंतर आकाशात ढग जमा होऊन पावसाचे वातावरण तयार झाले होते. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, या परिसरात पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांची धांदल उडाली होती अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढणी, उन्हाळी बाजरी काढणी सुरू होती ती पिके झाकण्यासाठी धावपळ सुरू होती तर अनेक ठिकाणी जनावरांसाठी साठवलेला चारा कडबा, वैरण झाकण्यासाठी शेतकरी पळत होते. अचानक आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने काही काळ उकाडाही कमी झाला होता. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्या दृष्टीने शेतकरी शेतीतील कामे लगबगीने करत असल्याचे चित्र दिसत आहे.
वऱ्हाडी मंडळींची धावपळ
आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाचा मुहूर्त मोठा असल्याने अनेक मंगल कार्यालयात, गावांमध्ये लग्न समारंभ होते. ढगांचा गडगडाट, विजांचा लख लखाट वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही काळ वऱ्हाडी मंडळीची एकच तारांबळ उडाली. लग्नासाठी लांबून आलेले वऱ्हाड घरी जाण्यासाठी धावपळ करत असताना दिसून आले.