दिवाळीतील वरुणराजाचे विघ्न दूर! चक्रीवादळ बंगालच्या दिशेने, मान्सून उद्यापर्यंत परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:12 PM2022-10-22T13:12:08+5:302022-10-22T13:13:18+5:30
यंदाच्या दिवाळीवरील पावसाचे विघ्न दूर हाेणार आहे...
पुणे : उत्तर महाराष्ट्रातून आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे येथून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रविवारनंतर पुणे व मुंबईतूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवरील पावसाचे विघ्न दूर हाेणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता सितरंग या चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. दिवाळी दरम्यान अधूनमधून अंशतः ढगाळ वातावरणासह काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
परिस्थिती अनुकूल
विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांतून मान्सून परतला आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर आणि मध्य बंगालचा उपसागर, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि यानामच्या काही भागातून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये आर्द्रता कमी झाली आहे. दक्षिण-मध्य भागात अजूनही आर्द्रता कायम आहे. त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाट, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता कायम आहे. रविवारपर्यंत आर्द्रतेत मोठी घट होईल, ज्यामुळे पुणे व मुंबईसह राज्याच्या बहुतेक भागांतून पुन्हा मान्सूनची माघार घेण्यास सुरुवात होईल.
- डॉ. अनुपम काश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज विभाग