पुणे : पावसामुळे शहरात झाडे, फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:29 PM2022-06-11T13:29:31+5:302022-06-11T13:31:04+5:30

काही भागातील वाहतूकदेखील विस्कळीत...

rain in pune city trees and branches fell in the city and vehicles were damaged | पुणे : पावसामुळे शहरात झाडे, फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान

पुणे : पावसामुळे शहरात झाडे, फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान

Next

पुणे : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पुणेकरांना मान्सूनपूर्व वादळी पावसाने असह्य उकाड्यापासून दिलासा दिला. पहिल्याच जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागात ३० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यात काही गाड्यांचे नुकसान झाले. काही भागातील वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांची पुरती दमछाक झाली.

पहिल्याच मान्सूनपूर्व वादळी पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले. पर्वती येथील शाहू कॉलनी, पुणे स्टेशन येथील जीपीओ, पोलीस आयुक्तालयासमोर, भवानी पेठ बीएसएनएल कार्यालय, प्रभात रस्ता, औंध येथील डॉ. आंबेडकर चौक, गणेश खिंड रस्त्यावरील राजभवनाजवळ, गुरुवार पेठ पंचहौद, कोंढव्यात शिवनेरीनगर, एनआयबीएम रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नवी पेठ, राजेन्द्र नगर, पर्वती स्टेट बँक कॉलनी, स्वारगेट येथे एसटी कॉलनी, कोंढव्यात आनंदपुरा हॉस्पिटल या ठिकाणी झाडे पडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली.

पोलीस आयुक्तालयाच्या गेटजवळच एक झाड पडले होते. त्याच्याखाली काही दुचाकी अडकल्या. जीपीओ येथे एक मोठे झाड कोसल्यामुळे काही दुचाकींचे नुकसान झाले. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या पाठीमागील सीमा भिंत दुचाकींवर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये आठ ते दहा दुचाकी व एक चारचाकीचे नुकसान झाले.

दरम्यान, पावसामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. महापालिकेने मान्सूनपूर्व पावसाळी कामे केली नसल्याचा फटका नागरिकांना बसला. लक्ष्मीनगर, सहकारनगर, संत गजानन महाराज चौक, शाहू कॉलेज रस्त्यावरील गटारे तुडुंब भरल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: rain in pune city trees and branches fell in the city and vehicles were damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.