गुढीपाडव्याला पुण्यात वरूणराजाची हजेरी; ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना सकाळी व सायंकाळी क्षणभर दिलासा
By श्रीकिशन काळे | Published: April 8, 2024 06:36 PM2024-04-08T18:36:50+5:302024-04-08T18:37:48+5:30
पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, बीड, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळेपुणेकरांचा घाम काढला आहे. गुढीपाडवा मंगळवारी असून, त्या दिवशी वरूणराजाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस राज्यातही गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. विदर्भात गेल्या आठवडाभर तापमानाचा पारा चाळीशीपार होता. पण रविवारपासून तापमान चाळीशीच्या आत आलेले आहे. त्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच आज सोमवारी (दि.८) सायंकाळी विदर्भ तसेच मराठवड्यातील उस्मानाबाद (धाराशिव), नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुढीपाडव्याला राज्यात वरूणराजा हजेरी लावेल, असा अंदाजही देण्यात आला आहे. मंगळवारी विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, बीड, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो.