Rain in Pune: सिंहगडावर पर्यटकांचे पावसाळी सेलिब्रेशन; घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:41 AM2023-06-26T10:41:38+5:302023-06-26T10:42:09+5:30
कोंडीमुळे पर्यटकही त्रस्त...
पुणे : आकाश ढगांनी भरलेले, वाऱ्याची थंडगार झुळूक, डोंगरावर पसरलेले धुके, रविवारची सुटी अन् सोबत मित्र- मैत्रिणींची साथ... अशा रोमँटिक वातावरणात पुणेकरांनी किल्ले सिंहगडावर मान्सूनचे स्वागत केले. गडावर गेल्यानंतर धुक्याचा आनंद लुटला, अनेकांनी सेल्फी घेतले. सोबत पिठलं- भाकरीचा आस्वाद घेऊन गडाची मस्त सफर केली.
दरवर्षी पाऊस आला की, पुणेकर सिंहगडावर धूम ठोकतात. तिथे जाऊन आनंद साजरा करतात. यंदा तर मान्सूनने पुण्यात येण्यासाठी रविवारची संधी साधली. त्यामुळे पुणेकरांना तर सुटीच्या दिवशी सेलिब्रेशन करण्यासाठी निमित्तच मिळाले. सकाळपासून आकाश भरून आले होते. सिंहगडाकडे वाहनांच्या रांग लागल्या होत्या. त्यामुळे घाट रस्ता भरून गेला. कोंढाणपूर फाट्याकडेच गाड्या लावून बरेच जण चालत गडावर गेले. लहान- मोठे असे सर्व वयोगटातील पर्यटकांनी पावसाचा आनंद लुटला. धुक्यात आणि हलक्या सरींमध्ये वातावरणही धुंद झाले हाेते. जोडप्यांसाठी तर हा दिवस अविस्मरणीय असा ठरला.
पाऊस म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात भावनांना ‘पूर’ येतो. चहा- भजी- कणसांची वाफाळती लज्जत, थंडगार हवा, पावसाचे टिपटिप असे सर्व काही एक वेगळाच माहोल तयार करून जाते. त्यामध्ये चिंब भिजण्यासाठी अनेक जण आसुसलेले असतात. त्यामुळे रविवारी गडावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. येथील आनंदाचा पूर सोशल मीडियावरही वाहत असल्याचे दिसून आले. प्रत्येक जण सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकत होते.
वाहतूककोंडीचा त्रास
किल्ले सिंहगडावर दर रविवारी पर्यटकांची गर्दी होतच असते; पण आज मात्र त्यात पावसामुळे भर पडली. पावसाचा आनंद लुटण्यासाठी गडावर जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. पायथ्यापासूनच वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.