राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार
By श्रीकिशन काळे | Published: May 17, 2024 06:12 PM2024-05-17T18:12:55+5:302024-05-17T18:14:04+5:30
तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे
पुणे: राज्यामध्ये पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. कोकणात हवामान दमट राहील, असेही सांगण्यात आले आहे. शुकवारी (दि.१७) सायंकाळी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समद्रामध्ये येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती पहायला मिळत आहे. परिणामी राज्यामध्येही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. सध्या राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच सकाळपासून मात्र उन्हाचा चटका जाणवत असून उकाडा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गुरूवारी (दि.१६) काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. परंतु, कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असा दोन्हीचा अनुभव नागरिकांना मिळत आहे.
राज्यात कोकणात मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच शनिवारी (दि.१८) कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला.
पुण्यात कसे राहील हवामान ?
पुणे व परिसराच्या भागामध्ये पुढील चार दिवस दिवसा उकाडा, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज दिला आहे. गेल्या २४ तासांमध्ये हडपसर २७.५ मिमी, तळेगाव १७.५ मिमी, मगरपट्टा ९.५ मिमी, चिंचवड ७.५ मिमी, वडगावशेरी ५ मिमी, शिवाजीनगर ३.५, कोरेगाव पार्क १.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.