Pune Rain: पुण्यात पाऊस वाढला; धरणांत ८८ टक्के पाणीसाठा, विसर्गही वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:15 PM2024-07-31T15:15:32+5:302024-07-31T15:17:44+5:30
काल रात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाने धरणे पुन्हा भरण्यास सुरुवात झाली असून दर २ ते ३ तासांनी विसर्ग सुरु आहे
पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी शिरल्याने हजारोंना स्थलांतर करावे लागले. त्यानंतर तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी रात्री धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा धडकी भरली. काल रात्रीपासून पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस (Pune Rain) सुरु झाला आहे. दरम्यान, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पातील चारही धरणांमध्ये सध्या २५.७८ टीएमसी अर्थात ८८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या आठवड्यात बुधवारी व गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी मुठा नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे शहरातील सुमारे साडेचार हजार नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रविवारी खडकवासला धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला. मात्र, सोमवारी पुन्हा पाऊस वाढल्याने विसर्गाचे प्रमाण २५ हजार ३६ क्युसेक करण्यात आले. मात्र, रात्रभरात पाऊस कमी झाल्याने हा विसर्ग मंगळवारी कमी करण्यात आला होता.
कालच्या जोरदार पावसाने आज सकाळपासून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सकाळी ७ वाजता ९, ४१६ क्यूसेक्स विसर्ग वाढवून ११, ४०७ क्यूसेक्स करण्यात आला. पुन्हा सकाळी ९ वाजता ११,४०७ क्युसेक्स विसर्ग वाढवून १३,९८१ करण्यात आला. तर आज सकाळी ११ वाजता १३,९८१ क्युसेक्स विसर्ग वाढवून १६,२४७ करण्यात आला आहे. चारही धरणं भरू लागल्याने दर २ ते ३ तासांनी विसर्ग केला जात आहे.
खडकवासला प्रकल्पात सध्या २५.२८ टीएमसी अर्थात ८८.४४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात २२.२० टीएमसी (७६.६१ टक्के) इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा अतिरिक्त आहे.
धरणसाठा (टीएमसीमध्ये)
धरण ................. पाणीसाठा ............. टक्के
खडकवासला.............१.६१............८१.४३
टेमघर ...............३.२८...........८८.४८
वरसगाव ..............११.१२ ................८६.७५
पानशेत ................९.७७ ..........९१.७६
एकूण ..................२५.२८ ............८६.७४