निवडणुकीवर पावसाचे सावट ; पुण्यात दुपारनंतर जाेरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:04 PM2019-10-20T15:04:44+5:302019-10-20T15:06:19+5:30
मतदानाच्या दिवशी देखील शहरात पाऊस हाेण्याची शक्यता असून खासकरुन दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे : आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. शनिवारी शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहरात पाऊस पडत आहे. उद्या मतदानाच्या दिवशी देखील दुपारनंतर शहरात जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीवर देखील आता पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असताना शहरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दिवसभर शहरात चांगलाच पाऊस झाला. रात्री सुद्धा पाऊस शहरात पडत हाेता. आज सुद्धा सकाळपासून रिमझिम पाऊस शहराच्या सर्वच ठिकाणी पडत आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांना पावसात भिजतच प्रचार करावा लागला. अनेकांनी पावसातच रॅल्या काढल्या. त्यामुळे उमेदारांची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
साेमवारी मतदानाच्या दिवशी देखील शहरात दुपारनंतर जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साेमवारी सकाळच्यावेळी आकाश निरभ्र असेल. दुपारी 2 नंतर शहराच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यता आली आहे. त्यामुळे या पावासाचा परिणाम मतदानावर हाेण्याची देखील शक्यता आहे. गेल्या चाेवीस तासांमध्ये शिवाजीनगर भागामध्ये 38 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे, तर पाषाण येथे 42. 8 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे.
शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मैदानांवर पाणी व चिखल साचल्याने त्यातूनच कर्मचाऱ्यांना इव्हीएम घेऊन वाट काढावी लागली.