पैशांचा पाऊस तर पडलाच नाही, पण तब्बल ५२ लाखांना लागला चुना; भोंदू मांत्रिक जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:17 PM2021-06-03T20:17:33+5:302021-06-03T20:18:36+5:30

जालन्याहून केली अटक, याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता...

The rain of money did not fall, but fruad of Rs 52 lakh; one person arrested | पैशांचा पाऊस तर पडलाच नाही, पण तब्बल ५२ लाखांना लागला चुना; भोंदू मांत्रिक जेरबंद

पैशांचा पाऊस तर पडलाच नाही, पण तब्बल ५२ लाखांना लागला चुना; भोंदू मांत्रिक जेरबंद

googlenewsNext

पुणे : सावकारी करणार्‍या व्यावसायिकाला एका मित्राने एका मांत्रिकाची माहिती दिली. तो पैशांचा पाऊस पाडुन देतो, असे भासविले. पैशाच्या हव्यासापायी त्याने तब्बल ५२ लाख रुपये दिले. पण पैशांचा पाऊस काही पडला नाही. मांत्रिकाने आणखी पैशाचे मागितल्याने या सावकाराला मानसिक धक्का बसला. त्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर चक्रे फिरली. जालना जिल्ह्यातून या भोंदू तांत्रिकाला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
किसन आसाराम पवार (वय ४१, रा. हिवरखेड, ता़ मंठा, जि़ जालना)  असे या मांत्रिकाचे नाव आहे. 

याप्रकरणी धायरीतील गणेशनगर येथील ४० वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने जालन्यातील एक मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याचे सांगितले. किसन पवार हा नेहमी पुण्यात येत असे. २०१६ च्या दरम्यान फिर्यादी यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी त्याने माहिती दिली. पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी आपल्याला छोटीशी पुजा करावी लागेल आणि पुजेसाठी काही पैसे पुजेत ठेवावे लागतील, असे सांगून आपण खरे बोलत असल्याचे भासविले. मित्राचे म्हणणे आणि पवार याचा अविर्भाव पाहून फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला. पवार याने स्वत:मध्ये दैवी शक्ती असून चमत्कार करण्याचा दावा केला. फिर्यादी याने त्याला वेळोवेळी थोडे थोडे करुन तब्बल ५२ लाख १ हजार रुपये दिले. तरी त्यांना त्याची प्रचिती आली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देणे बंद केले. 

त्यानंतर नुकतेच पवार याने तुमचे काम झाले आहे. परंतु, एक शेवटचा विधी राहिला आहे, तो तुम्हाला करावा लागेल, असे सांगितले. त्याचा फिर्यादी यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. त्यांनी किसन पवार याची माहिती घेतल्यावर तो जालना जिल्ह्यातील गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक बनावट ग्राहक तयार केले. त्याबाबत खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकून पवार व त्याने तेथील सर्व वापरलेले साहित्य ताब्यात घेतले. त्याला पुण्याला आणून अटक करण्यात आली आहे. 

अशा प्रकारे किसन पवार याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. पवार याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे माहिती द्यावी, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, अंमलदार दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी केली आहे.

Web Title: The rain of money did not fall, but fruad of Rs 52 lakh; one person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.