पुण्यात गारांचा पाऊस
By admin | Published: May 13, 2015 03:13 AM2015-05-13T03:13:41+5:302015-05-13T03:13:41+5:30
शहराच्या काही भागांत मंगळवारी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारीही दुपारनंतर मेघगर्जनेसह
पुणे : शहराच्या काही भागांत मंगळवारी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारीही दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
हवामानातील बदलांमुळे राज्यावर सध्या आठवडाभर अवकाळी पावसाचे सावट आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातही सातत्याने ढगाळ वातावरण राहत आहे. तीन दिवसांपूर्वी शहर व उपनगरांच्या काही भागांत पाऊस झाला होता. मंगळवारीही सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहराच्या काही भागांत पावसाला सुरुवात झाली. शहरातील काही पेठा तसेच मध्यवर्ती भागात गारा पडल्या. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच गारांचा पाऊस पडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पुण्याच्या मध्य भागात गेल्या अनेक वर्षांनंतर गारा पडल्या. पुणे वेधशाळेकडे मंगळवारी ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी प्रचंड उकाडा वाढला होता. शहरात ३९ अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.