पुण्यात पावसाची जाेरदार बॅटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:49 PM2019-06-09T18:49:06+5:302019-06-09T18:50:02+5:30
एकीकडे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया विराेधात जाेरदार बॅटींग करत असताना पुण्यात पाऊस देखील जाेरदार बॅटींग करत आहे.
पुणे : एकीकडे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया विराेधात जाेरदार बॅटींग करत असताना पुण्यात पाऊस देखील जाेरदार बॅटींग करत आहे. रविवारी संध्याकाळी आकाश भरुन आले आणि जाेरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी अनेकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समाेर आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर पावसची चातकासारखी वाट बघत हाेते. यंदा पुण्याचे तापमान चाळीशी पार गेले हाेते. त्यामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले हाेते. त्यामुळे आज आलेल्या पावसामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. शुक्रवारी पावसाने पुण्यात हजेरी लावली हाेती. पुण्याचे उपनगरात पावसाच्या जाेरदार सरी काेसळल्या हाेत्या तर मध्य शहरात हलका पाऊस पडला. आज मात्र संध्याकाळी 6 च्या सुमारास जाेरदार पावसाने हजेरी लावली. शहराच्या सर्वच भागात पाऊस जाेरदार बॅटींग करत हाेता. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पाऊसामुळे काही ठिकाणांचा वीज प्रवाह काही काळासाठी खंडीत झाला.
पाऊस पडत असल्याने सर्वांनाच आनंद झाला. फेसबुक, व्हाॅट्सअप वर देखील पावसाचे फाेटाे तसेच व्हिडीओ पाेस्ट केले जात हाेते. रविवार असल्याने तसेच भारताची मॅच असल्याने रस्त्यांवर गर्दी कमी हाेती. अनेकांनी घरात बसून मॅच बराेबरच पावसाचा आनंद लुटला. मॅच आणि पाऊस असा दुहेरी याेग पुणेकरांना अनुभवायला मिळाला.