बरसा रे सावन जोर जोर से...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 07:42 PM2018-06-01T19:42:23+5:302018-06-01T19:42:23+5:30
यावर्षी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे झालेले आगमन वातावरणात रंग भरुन गेले.
पुणे: काही दिवसाच्या प्रचंड उकाड्याने प्रत्येकजण हैराण झाला होता. अशा परिस्थितीत शुक्रवारी दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली. त्यानंतर उष्णतेची जागा वाऱ्याने घेतली. सरीवर सरींनी मुसळधार रुप धारण करत कोसळलेला वरुणराजा लहान मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रसन्नता, समाधान, आनंदाची मोहोर उमटवून गेला. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, लोणावळा, जुन्नर, आदी परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारांचा पाऊस देखील बरसला...
गेले काही दिवस मान्सूनच्या प्रवासाच्या बातम्यांनी तो कधी एकदा हजेरी लावतो असे झाले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात निर्माण झालेला प्रचंड असहाय्य उकाडा.. मात्र, शुक्रवारी अखेर तो आला आणि त्याने निसर्गासह सर्वांचेच रुप पालटवले. या पावसाने सर्वांचीच थोडी धावपळपण केली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ देखील उडवली. सायंकाळी लोणावळा परिसरातील कार्ला, वाकसई, सदापुर, वरसोली आदी भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.
...................
वीज पुरवठा वारंवार खंडित
देहूरोड परिसरातील विकासनगर, किवळे, चिंचोली,गहूंजे आदी भागात शुक्रवारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तासभर पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात किवळे, विकासनगर, देहूरोड व चिंचोली येथे मुख्य रस्त्यांवर पाण्याची तळी साचली होती. वीज पुरवठा दिवसभर वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले होते .
...................
कामशेतमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहक सुरुवात झाल्यामुळे वृद्ध,महिला,नागरिक व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शुक्रवारी सकाळपासून कडक उन्हामुळे नागरिकांना घरात बसणेही शक्य नसताना सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक सुखावले.
.....................
घोडेगाव, शिरुर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू
घोडेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या बातम्या येत होत्या.
दरम्यान, भिमाशंकर व तळेघर परिसरातही तुरळक पाऊस झाला तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
या पावसाची सगळेच जण वाट पाहात होते. जिल्हयात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाने वाढत चाललेल्या उकाड्याच्या दिवसात एख सुखद दिलासा दिला.