...आणि पुण्यात पाऊस आला : शहराच्या काही भागात जोरदार सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 08:46 PM2019-06-22T20:46:48+5:302019-06-22T20:47:56+5:30
शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़.
पुणे : शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़.
सकाळपासून आकाश ढगांनी भरुन गेले असले तरी पाऊस पडत नव्हता़. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोराच्या सरी येण्यास सुरु झाल्या़. काही वेळातच रस्त्यावरुन पाणी वाहू लागले़. या हंगामातील हा पहिलाच मोठा पाऊस असल्याने मुले पावसात खेळण्याचा व एकमेकांच्या अंगावर पाणी उडत होते़. वाहनचालकांनी पावसात भिजत जाण्यात आनंद मानला़.
शहरातील गल्ली बोळात केलेल्या सिमेंटच्या रस्त्याच्या अनिर्बंध कामामुळे जोरदार पाऊस आला तर रस्त्यांची काय अवस्था होईल, याची चुणूक या छोट्याच्या पावसात पहायला मिळाली़. अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते हे उंच झाले आहेत़. चौकात त्यांना मिळणाऱ्या गल्ल्यातून येणारे रस्ते हे खाली झाले आहेत़. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावरील पाणी छोट्या रस्त्यांवर येऊन जेथे हे रस्ते मिळतात, तेथे रस्त्यावर तळे झाल्याचे दृश्य दिसून येत होते़. अनेक ठिकाणी फुटपाथ उंच झाल्याने रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते़.
नऱ्हे परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या़. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्योन दुचाकी चालकांना कसरत करावी लागत होती़. धनकवडी, आंबेगाव पठार येथे काही वेळच पण जोरदार पाऊस झाला़.