कोकण, पुणे, सातारा घाट परिसरात ‘रेड अलर्ट’; राज्यात येत्या २ दिवसांत पावसाचा जोर वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 09:47 AM2023-07-27T09:47:27+5:302023-07-27T09:48:17+5:30
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असल्याने अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जात आहे
पुणे: राज्यात सलग दुसऱ्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. परिणामी, राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुरुवारी कोकण, पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरासाठी व दक्षिण कोकणासाठी रेड अलर्ट अर्थात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असल्याने अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जात आहे. ही प्रणाली पुढील तीन दिवसांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे तयार झालेल्या राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
या अंदाजानुसार पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व वदर्भात पुढील २४ तासांत काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवस पाऊस काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात काल झालेला पाऊस (मिमीमध्ये)
महाबळेश्वर ६४
पुणे ३.९
कोल्हापूर ४
सोलापूर ३
मुंबई १०३
सांताक्रुझ ७९
अलिबाग ४६
रत्नागिरी ७०
डहाणू ११
ब्रह्मपुरी ३
चंद्रपूर २९
गोंदिया २
पुणे व परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर घाट परिसरात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. शहरात बुधवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
पुण्यात रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमी) : शिवाजीनगर ३.९, पाषाण ४.२, लोहगाव ५.८, चिंचवड ८.५