शहरात पावसाच्या तुरळक सरी
By admin | Published: June 16, 2015 12:06 AM2015-06-16T00:06:03+5:302015-06-16T00:06:03+5:30
गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारवा आहे.
पिंपरी : गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारवा आहे. आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, ती केवळ अर्धा तासच.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग गर्दी करतात. वातावरणात घट होऊन गारवा निर्माण झाला आहे. थंड वारे वाहत आहेत. यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, पाऊस हुलकावणी देत आहे.
आज सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. शहरातील काही भागांत सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मात्र, तो दमदार नव्हता. अर्ध्या तासात पाऊस गायब झाला. त्यानंतर थोड्याफार
सरी पडल्या. जोरदार पावसाची अपेक्षा असताना थोड्या फार सरी पडल्याने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली. शहरातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)