मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:26+5:302020-12-13T04:28:26+5:30
पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. ...
पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदविले गेले.
राज्यातील सध्याच्या हवामानाबाबत ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे समुद्रावरुन येणारे वारे बाष्प घेऊन येत आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यावर वारे हे चक्राकार पद्धतीने घड्याळाच्या उलट दिशेने फिरुन दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहेत. हे सध्या तीन ते साडेचार किमी उंचावरुन वाहत आहेत. वारे जसे उंच जातात तसे त्यांचे तापमान कमी होते. ५ किमी उंचीवर त्यांचे तापमान शुन्य अंश सेल्सिअस इतके होऊन वार्यांमधील बाष्पाचे गारांमध्ये रुपांतर होते. अशा गारांचे संख्या वाढली व खालून येणाऱ्या वाऱ्यांपेक्षा त्यांचे आकारमान व वजन जास्त झाले की ते खाली येतात व गारपीट होते. मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
१३ डिसेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, नाशिक, पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १३, १४ व १५ डिसेंबर रोजी अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १४ व १५ डिसेंबर रोजी गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात १५ व १६ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
...........
पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यता
शहरात पुढील दोन दिवस आकाश अशंत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमान १७.९ अंश सल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ६.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.