Pune Rain Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
By श्रीकिशन काळे | Published: May 22, 2024 05:25 PM2024-05-22T17:25:29+5:302024-05-22T17:25:46+5:30
राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे
पुणे : शहरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडपडीच्या घटना होतात, त्यामुळे नागरिकांनी योग्य त्या ठिकाणी सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यासह राज्यातील नगर, सांगली, रत्नागिरी, धाराशिव आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नैऋत्य मॉन्सून मालदीवच्या, दक्षिण बंगालच्या काही भागात, अंदबान निकोबारच्या काही भागात दाखल झाला आहे. वातावरणातील द्रोणीय रेषा मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्रातून जात आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात सर्वत्र पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विदर्भ, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर व जिल्ह्यात आजपासून दोन दिवस उष्णतेची लाट येणार असून, बुधवारीच पुण्याचे कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे.