पुण्यात होता पावसाचा अंदाज; शुक्रवारनंतर वाढणार थंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:15 AM2022-12-14T10:15:31+5:302022-12-14T10:15:39+5:30
शुक्रवारनंतर पुन्हा राज्याच्या उत्तर-मध्य-पूर्व भागात किमान तापमानात किरकोळ घट अपेक्षित
पुणे : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात विशेषकरून कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुणे शहरातही गुरुवारपर्यंत वातावरण ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव शुक्रवारनंतर कमी होऊन त्यानंतर थंडीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे.
उत्तर केरळ, कर्नाटक किनाऱ्यापासून दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर मंगळवारी (दि. १३) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पश्चिम-वायव्येकडे सरकले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळपर्यंत भारताच्या किनाऱ्यापासून पश्चिमोत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पसरेल.
गुरुवारी (दि. १५) सकाळी ते पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात अंशतः ते साधारण ढगाळ स्थितीत राहून अत्यंत हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती गुरुवारपर्यंत राहील. त्यानंतर हळूहळू, मुख्यतः निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहील. शुक्रवारनंतर पुन्हा राज्याच्या उत्तर-मध्य-पूर्व भागात किमान तापमानात किरकोळ घट अपेक्षित आहे.