अडीच लाखांत रेन वॉटर हार्वेस्टिंग
By admin | Published: May 16, 2017 06:43 AM2017-05-16T06:43:14+5:302017-05-16T06:43:14+5:30
आमदार निधीतून एरवी होतात फक्त सिमेंटचे रस्ते, पेवर ब्लॉक किंवा मग बसण्यासाठी बाक वगैरे! आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या सगळ्याला फाटा देत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आमदार निधीतून एरवी होतात फक्त सिमेंटचे रस्ते, पेवर ब्लॉक किंवा मग बसण्यासाठी बाक वगैरे! आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या सगळ्याला फाटा देत आपल्या निधीचा वापर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभे करण्यासाठी केला आहे. मतदारसंघांतील ८ सोसायट्यांमध्ये त्यांनी हा प्रकल्प केला असून आणखी १७ सोसायट्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी हे काम होणार आहे.
आमदार निधीचा वापर करण्यासंबधी अनेक नियम आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून त्याचे नियंत्रण केले जाते. त्यामुळेच कुलकर्णी यांनी निधीचा वापर सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी करण्याचे ठरवले; मात्र त्याला नकार मिळाला. त्यामुळे मग थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा निधी या कामासाठी वापरू देण्याची विनंती केली. पावसाचे वाया जाणारे पाणी वाचविणे हा निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचाच प्रकार आहे. अनेक सोसायट्यांमध्ये असा प्रकल्प सुरू करण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे ते कधीही लक्ष देत नाहीत. त्यांच्या इमारतीवरील पावसाचे सर्व पाणी गटारामध्ये जाते. त्याचा कोणालाच काहीही उपयोग होत नाही, हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
त्यानंतर विशेष बाब म्हणून कुलकर्णी यांच्या या मागणीला मान्यता देण्यात आली. लगेचच त्यांनी आपल्या मतदारसंघात हे काम सुरू केले. एका कामासाठी साधारण अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. खासगी एजन्सीकडून न करता हे काम त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच करून घेणे पसंत केले. त्यासाठी इमारतीमध्ये बोअर असणे आवश्यक आहे. बोअर नसेल तर ते करून घेण्याचा खर्च मात्र सोसायटीला करावा लागतो. इमारतीच्या गच्चीवरून एका पाईपद्वारे सर्व पाणी इमारतीच्या खाली घेण्यात येते. तो पाईप बोअरमध्ये सोडला जातो. पाईपला मध्यभागी एक फिल्टर बसवण्यात येतो. त्यामुळे बोअरमध्ये कचरा, गाळ जात नाही.
आमदार कुलकर्णी यांनी सांगितले, की अनेक सोसायट्यांना हे काम करण्याची इच्छा असते; मात्र इतका खर्च कोणी करायचा, हा
प्रश्न असतो.
मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे आता हा खर्च या निधीतून करता येत आहे. सोसायट्यांनी त्यांच्या लेटरहेडवर
एक पत्र द्यावे व अशा प्रकल्पासाठीची बोअर व अन्य प्राथमिक तयारी
करावी, त्यांना हा प्रकल्प सुरू करून देण्यात येईल.