Pune Rain: अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार! पुणेकरांना बाप्पांची वैभवशाली मिरवणूक पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:40 PM2024-09-13T13:40:08+5:302024-09-13T13:40:33+5:30
पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस ओसरणार असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात पाऊस नसल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उन्ह पडत असून, पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गणपती दर्शन करण्यासाठी पुणेकरांची गर्दी पाहायला मिळत नाही. परंतु, पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस ओसरणार आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाचा पुण्याला धोका नसेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
सध्या राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. काही भागात ढगाळ वातावरण असून, जोरदार पावसाची नोंद केवळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तसेच सोमवारपासून (दि. १६) विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल, असेही सांगितले आहे. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी (दि. १६) विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
कधी पाऊस, तर कधी उन्ह!
सध्या पुणे शहरामध्ये हलक्या सरी कोसळत आहेत. कधी उन्ह पडते तर कधी पावसाच्या सरी येतात. त्यामुळे पुणेकरांमध्ये गणपती पाहायला घराबाहेर पडावे की नाही, अशी संभ्रमावस्था आहे; पण पुढील दोन-तीन दिवस पाऊस कमी होईल, असा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यातील २४ तासांतील पाऊस
भोर : २६.५ मिमी
लोणावळा : १०.५ मिमी
बारामती : ७ मिमी
माळीण : ४.५ मिमी
इंदापूर : २.५ मिमी
मगरपट्टा : १.५ मिमी
तळेगाव : १ मिमी
कोरेगाव पार्क : ०.५ मिमी
हडपसर : ०.५ मिमी
शिवाजीनगर : ०.३ मिमी