बारामती, इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस
By Admin | Published: May 6, 2015 05:47 AM2015-05-06T05:47:49+5:302015-05-06T05:47:49+5:30
बारामती, इंदापूर तालुक्यात आज दुपारीनंतर वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभ्या पिकांची हानी झाली.
बारामती : बारामती, इंदापूर तालुक्यात आज दुपारीनंतर वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभ्या पिकांची हानी झाली. मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. अवकाळी पावसाने उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना
दिलासा मिळाला. मात्र, बाजरी पिकासह अन्य पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बारामती तालुक्यातील पिंपळी गावच्या परिसरात गारपीटीने देखील झोडपले. गारांचा खच ठिकठिकाणी पडलेला दिसून आला.
बारामती शहरात दुपारी ३ वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. वादळाबरोबर तुरळक पावसाच्या सरी सायंकाळी पडल्या. तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. (वार्ताहर)
कळंब परिसरात अर्धातास पाऊस
च्कळंब : कळंब (ता. इंदापूर) येथे आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार वादळी वारा वाहू लागला. तसेच, आभाळ भरून आले. सतत अर्धा ते पाऊन तास तुरळक पाऊसाच्या सरी पडू लागल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. गेली काही दिवसांपासून कडक उन्हामुळे व वातावरणातील उकाड्यामुळे कळंब परिसरातील नागरिक हैराण झाले होते. परिणामी काही नागरिक कडक उन्हात घरात बसून राहणे पसंत करत होते. तर युवक वर्ग विहिरीत डुंबण्याचा व पोहण्याचा आनंद उपभोगत होते. आज अचानक पडलेल्या तुरळक पावसाने वातावरणातील उकाडा कमी होऊन काहीसा गारवा निर्माण झाला.
झारगडवाडी परिसरात पिकांचे नुकसान
च्डोर्लेवाडी : झारगडवाडी (ता. बारामती ) व परिसरात मंगळवारी (दि. ५) अवकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर चालवणाऱ्या वाहन चालकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. वारे एवढे जोरात होते की काही जणांच्या गाड्या रस्त्यावरून बाजूला गेल्या. काही जण गाडी थांबवून उभे राहिले. झारगडवाडी येथील अहिल्यादेवी चौकामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या वादळी वाऱ्याने तुटून रस्त्यावर पडल्या. सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नाही. पिंपळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटीने झोडपले. गारांचा खच ठिकठिकाणी पडलेला दिसून आला.
च्वालचंदनगर : परिसरातील रत्नपुरी, जंक्शन, शिरसटवाडी, शेळगाव परिसरात सुरुवातीला वादळाने तडाका दिला. त्यानंतर संततधार पाऊस पडला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले. मात्र, झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता आला नाही. बारामती तालुक्यातील पारवडी परिसरात देखील संततधार पावसाने हजेरी लावली. पाऊस पडण्यापूर्वी जोरदार वादळ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भोरमध्ये फळबागांचे नुकसान
भोर : तालुक्यात गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील आंबा, अंजीर, डाळिंबाच्या व अळूच्या पानांच्या बागा व टोमॅटो, वांग्याचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, दुपारनंतर अचानक ढग भरून आले. आणि गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वेळू, गोगलवाडी परिसरातील अंजीर, आंबा, डाळिंबाच्या बागेतील झाडे मोडली. तसेच फळांचे नुकसान झाले. नवीन लावलेली टॉमॅटो, वांगी व अळूची पाने खराब झाली. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे, अचानक झालेल्या पावसामुळे लग्नसराईत गुंतलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. महामार्गावरील पावसाने नुकसान झालेल्या पांडुरंग किसन पांगारे, सुदाम कुंजीर, योगोश पांगारे या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी भोर पंचायत समितीचे सदस्य अमोल पांगारे यांनी केली. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. यावेळी जग्गनाथ वाडकर, सदाशिव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते . तालुक्याच्या पश्चिम भागातील घराबाहेर साचवलेले गवत, पेंढा व लाकडे भिजली, तर शेतातून काढलेला कांदा भिजला. उन्हाळी भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची व भोरच्या बाजारातील भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. (वार्ताहर)