खड्ड्यांच्या तक्रारींंचा पाऊस, महापालिकेचा अॅक्शन प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:18 AM2018-07-19T01:18:43+5:302018-07-19T01:20:19+5:30
सिंहगड रोडला राजाराम पुलाच्या येथे मोठा खड्डा पडला... विठ्ठलवाडी येथे ड्रेनेजचे झाकण तुटले असून, मोठा अपघात होऊ शकतो.
पुणे : सिंहगड रोडला राजाराम पुलाच्या येथे मोठा खड्डा पडला... विठ्ठलवाडी येथे ड्रेनेजचे झाकण तुटले असून, मोठा अपघात होऊ शकतो.... धायरीत रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांस सर्वांनाच प्रचंड अडचण निर्माण होतेय... अशा अनेक तक्रारी करणारे फोन महापालिकेत बुधवारी दिवसभर खणखणत होते. तक्रार आल्यानंतर तातडीने महापालिकेच्या पथ विभागाकडून दखल घेऊन खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ पोहोचते. बुधवारी दिवसभरात महापालिकेकडे ५५ तक्रारी आल्या. यापैकी ४० ठिकाणी दुरुस्तीदेखील करण्यात आली.
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यामध्ये उपनगरासह मध्यवस्तीमध्ये तर रस्त्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. शहरात झालेल्या पहिल्याच पावसानंतर रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या कारभाराचे पितळच उघडे पडले आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत जोरदार चर्चा झाली. पावसामुळे रस्त्यांना पडलेले खड्डे, शहराच्या विविध भागात सुरू असलेले मेट्रोचे काम, महापालिकेच्यावतीने भरपावसात सुरू असलेली फुटपाथ व सिमेंट रस्त्यांची कामे यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे गेल्या काही दिवसांतच पुणेकर हैराण झाले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी खास टेलिफोन क्रमांक देण्यात आला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत महापालिकेला ५२ ते ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये तक्रारी आल्यानंतर पथ विभागाच्या कर्मचाºयांमार्फत तातडीने खड्डे बुजविण्यात येत आहेत.
>खड्डे बुजविण्यासाठी खास ‘कोल्डमिक्स’चा वापर
खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत हॉटमिक्स (गरम डांबरमिश्रित खडी) वापरले जात होते.
परंतु पावसाळ््यामध्ये ओल्या खड्ड्यांमध्ये ही डांबरमिश्रित खडी घट्ट बसत नसल्याने खास नवीन तंत्रज्ञान ‘कोल्डमिक्स’चा वापर सुरू करण्यात आला.
यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर त्वरित खड्डेदुरुस्ती करणे शक्य होऊ लागले आहे.
महापालिकेच्या पथ विभागाच्यावतीने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यामध्ये नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवर २४ तासांच्या आत दखल घेऊन दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय शहराच्या प्रत्येक भागातील रस्त्यांचे नियोजन करून खड्डे बुजवणे, ड्रेनेजची तुटलेली झाकणे दुरुस्त करणे आदी सर्व प्रकारची कामे करण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र यंत्रणाच कामाला लावली आहे.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख