जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये पावसाची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:03+5:302021-08-23T04:13:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील दोन आठवड्यांत त्यामुळे प्रमुख धरणांतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील दोन आठवड्यांत त्यामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात कोणत्याही प्रकार वाढ झाली नाही. विशेषत: कुकडी प्रकल्पातील धरणक्षेत्रात जेमतेम पाऊस पडला असून, ऑगस्ट महिना संपत आला तरी प्रकल्पात केवळ ५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांसह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच खेड तालुक्यांच्या काही भागासह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील शेतीसाठी कुकडी प्रकल्पातील आवर्तन अत्यंत उपयुक्त असते. कुकडीच्या पाण्यामुळे या तालुक्यातील शेतकरी विविध पिके घेत असतो. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने येथील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांना सध्या खरिपाच्या पिकांचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. तसेच पावसाने माेठी ओढ दिली, तर येणाऱ्या रब्बी हंगामाला देखील मोठा फटका बसणार आहे.
पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात (मुठा खोरे) ९५.९१ टक्के (२७.९६ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ पैकी ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याचबरोबर नीरा खोऱ्यात देखील ९२.६३ टक्के चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. तर नाझरे धरणांत २८.२८ टक्के पाणी जमा झाले आहे.
‘उजनी’तील आवक मंदावली; ६२ टक्के पाणीसाठा
पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६२.३६ टक्के (३३.४१ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीतून उजनी धरणात येणाऱ्या विसर्ग मागील दोन आठवड्यापासून मंदावला आहे. ८ ऑगस्टला ६१ टक्के पाणीसाठा होता. मात्र, मागील दोन आठवड्यांत फक्त त्यात जेमतेम १ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
------
चौकट
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची माहिती
धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी-टक्केवारी
टेमघर ३.७१ ३.३१ ८८.३४
वरसगाव १२.८२ १२.८२ १००
पानशेत १०.६५ १०.६५ १००
खडकवासला १.९७ १.१८ ५९.५९
पवना ८.५१ ८.२९ ९७.४६
कासारसाई ०.५७ ०.५६ ९७.८८
मुळशी १८.४७ १७.१६ ८५.१२
कळमोडी १.५१ १.५१ १००
चासकमान ७.५८ ७.५८ १००
भामा आसखेड ७.६७ ६.८९ ८९.८४
आंध्रा २.९२ २.९२ १००
वडीवळे १.०७ ०.८९ ८२.८९
शेटफळ ०.६० ०.०९ १००
गुंजवणी ३.६९ ३.२६ ८८.३३
भाटघर २३.५० २१.४४ ९१.२१
नीरा देवघर ११.७३ ११.२८ १००
वीर ९.४१ ८.३४ ८८.६६
नाझरे ०.५९ ०.१७ २८.२८
पिंपळगाव जोगे ३.८९ १.१३ २९.०६
माणिकडोह १०.१७ ४.५४ ४४.६१
येडगाव २.८० ०.७० ३६.१६
वडज १.१७ ०.६९ ५८.७४
डिंभे १२.४९ ११.३० ९०.४४
चिल्हेवाडी ०.९६ ०.६२ ६४.७०
घोड ५.४७ १.२२ २५.१३
विसापूर ०.९० ०.०३ ३.१२
उजनी ५३.५७ ३३.४१ ६२.३६