धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय, भोर, वेल्हे, मुळशी, मावळमध्ये दमदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:18 AM2018-08-14T01:18:23+5:302018-08-14T01:20:05+5:30
गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली .
पुणे - गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मुळशी, भोर, वेल्हे व मावळ या तालुक्यांत दमदार हजेरी लावली.
जिल्ह्यात सामेवारी सकाळपर्यंत ६०६.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. हंगामाच्या टक्केवारीत तो ७१.१ टक्के इतका असून ३ महिन्यांत सरसरी ९६.९ टक्के इतका आहे. आतापर्यंत पावसाचे प्रमाण चांगले असले, तरी जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त भागाकडे मात्र त्याने पाठ फिरवली आहे. बारामती, इंदापूर, दौैंड, शिरूर व पुरंदर या तालुक्यांत मात्र पाऊस नसल्याने पाणी व चारा यांची टंचाई निर्माण झाली आहे.
दरम्यान, जुलैै महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, दोन दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळीही झपाट्याने वाढत आहे. भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण सोमवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या २१ दरवाजांतून विसर्ग सुरू केला आहे.
भाटघर ओव्हरफ्लो!
भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरल्याने स्वयंचलित २५ दरवाजांमधून सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता १२०० क्युसेक्सने पाणी खाली सोडण्यात येत आहे, तर पावरहाऊसमधून १३२६ असे एकूण २५२६ क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास येणाºया पाण्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
भाटघर धरणभागात आज ९ मिमी तर एकूण ४९० मिमी पाऊस होऊन धरण १०० टक्के भरले. धरणात २४ टी.एम.सी पाणीसाठा आहे. धरणावर नारळ फोडून पाणीपूजन करण्यात आले. आज सायंकाळी ४ वाजता भोंगा वाजवून सर्वांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर ४.१५ वाजता धरणाचा पहिला गेट सुरु करण्यात आला. त्यानंतर धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह वाढत गेला. एकूण ४५ दरवाजांपैकी २५ दरवाजांमधून १२०० क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे.
भाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे आहेत. यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० क्युसेक्सने एकाच वेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गेल्या वर्षी ३० आॅगस्टला १०० टक्केच भरले होते. मात्र या वेळी १७ दिवस लवकर भरले आहे, असे शाखा अभियंता नलावडे यांनी सांगितले.
मुळशी धरण शंभर टक्के भरले
पौड : गेले महिनाभर झालेल्या दमदार पावसामुळे मुळशी धरण (दि. १२) पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या होत असलेल्या संततधार पावसामुळे (दि. १३) सकाळपासून या धरणातून २००० क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत असल्याची माहिती टाटा कंपनीने तहसील कार्यालयाला दिलेल्या पत्राद्वारे दिली. धरण भरल्याने मुळा नदी परिसरातील शेतकरी व मुळशी प्राधिकरण योजनेचा लाभ घेणाºया गावाच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. या भागात पावसाचा जोर कायम असून, हा विसर्ग हळूहळू वाढवून ४ हजार ४०० क्युसेक्सपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिली आहे. यामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार असून, नदी परिसरातील नागरिकांनी दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला.