दोन कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 02:25 AM2020-11-22T02:25:27+5:302020-11-22T02:25:35+5:30
पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिणेत तामिळनाडुसह अनेक राज्यात २३ ते २७ नोव्हेबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सुदैवाने या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा मुंबईसह राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३५.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शुक्रवारी राज्यात पुणे ५.१, लोहगाव २२.४, गोंदिया ११ आणि नागपूर येथे ३.५ मिमी पावसाची नोंद झाली. २२ नाेव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहील. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.