पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित
By admin | Published: June 10, 2015 04:39 AM2015-06-10T04:39:46+5:302015-06-10T04:39:46+5:30
परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
दावडी : परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पडलेल्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
वीज मंडळाकडे तक्रार करूनही अद्याप कुठलीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दावडीचे माजी सरपंच सुरेश डुंबरे यांनी केली आहे.
दावडी परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्यामुळे विजेचे सिमेंट खांब कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दिघेवस्ती, आमराळवाडी, डुंबरेवस्ती, गावडेवस्ती या वस्त्यांवरील वीजपुरवठा बंद आहे. वीज नसल्यामुळे घरगुती वीज, पिठाच्या गिरण्या, विद्युत पंप बंद आहेत.
कुरकुंभला पावसाचे थैमान
कुरकुंभ : येथे रविवार रात्री झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले तब्बल दिड तासात पाणीच पाणी करुन टाकले. दरम्यान या पावसामुळे बऱ्याच घरामध्ये तसेच दुकानात पाणी जमा झाल्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली.
रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. क्षणार्धात कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे डोंगर कड्यावरील पाणी मिळेल त्या मार्गाने वेगात घरात घुसले त्यामुळे एकच धावपळ उडाली. दरम्यान दौड -बारामती रोड लगत असणाऱ्या नाल्याला पुराचे स्वरुप आले त्यामुळे येथील छोट्या पुलावरुन पाणी वाहिल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
पुणे -सोलापुर महामार्गावर असणारा सेवा रस्ता , कुरकुंभ - पांढरेवाडीला जोडणारा रस्ता यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच महामार्गावरील भराव पुलाचा भराव बऱ्याच ठिकाणी वाहून जात जवळील दुकानात गेला त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले.
येथील नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पात्र अगदीच लहान झाले आहे. त्यामध्ये कचऱ्याचे ढीग तसेच झाडे देखील वाढली आहेत.