वरुणराजाची 'कृपादृष्टी' : पुणे शहरात पावसाने ओलांडली वर्षाची सरासरी ; आतापर्यंत ७४३ मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 12:17 AM2020-09-20T00:17:40+5:302020-09-20T00:21:40+5:30
पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते.
पुणे : जूनपासून सातत्याने पडलेल्या पावसाने यंदा परिसरातील सर्व धरणे भरली असून पावसाळ्याच्या चार महिन्यांनी ११ दिवस बाकी असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पुणे शहरात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५६० मिमी पावसाची नोंद होते. तर वर्षभरात साधारण ७४० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र १ जूनपासून आजअखेरपर्यंत ७४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात सुरुवातीपासून शहरात चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्याचवेळी ऑगस्टमध्ये संपूर्ण महिन्याभर अधूनमधून जोरदार पाऊस होत होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल २४६.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
१९ सप्टेंबरला सकाळपर्यंत पुणे शहरात ७२९.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती आजपर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा तब्बल २३२.४ मिमीने अधिक आहे. शनिवारी दिवसभरात १४ मिमी पावसाची नोंद झाली असून शहरात १ जूनपासून आतापर्यंत ७४३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
त्याचवेळी लोहगाव येथे ७४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ३२८.५ मिमीने अधिक आहे. आज दिवसभरात लोहगाव येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे ७४४.२ मिमी इतका पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षीही शहरात वर्षभरात ११०० मिमीहून अधिक पाऊस झाला होता.
पुढील काही दिवस शहरात हलक्या ते स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अजून परतीचा पाऊस सुरु झालेले नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पाऊस हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
़़़़़़़़़
महिना पडलेला पाऊस (मिमी) एकूण पाऊस (मिमी)
जून २२० २२०
जुलै १३०.३ ३५०.३
आॅगस्ट २४६.६ ५९६.९
१९ सप्टेंबर १४६.६ ७४३.५