सासवड, जुन्नर, शिरूर परिसरात पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:17 PM2018-04-07T20:17:16+5:302018-04-07T20:17:16+5:30
शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली
पुणे : पुरंदर, खेड, शिरूर व जुन्नर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सासवड शहरात १0 ते १५ मिनिटे पाऊस झाला. येथे काही वेळ गारांचा वर्षावही झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे पाऊस आल्याने सासवडसह काही ठिकाणी वीज गेली होती. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली. सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले, त्यामुळे शेतामध्ये मळणीसाठी काढून ठेवलेला हरभरा, गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. वाऱ्याचा प्रवाह एवढा जोरात होता की हवेत मोठ्या प्रमाणात धूळ मिसळली गेली. काढणीला आलेल्या गहू, हरभरा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी या पिकांना फटका बसला आहे. सायंकाळी उत्तरेकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी या उष्णतेचे थंडाव्यात रूपांतर केले. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही झाल्या. जुन्नर तालुक्यात उदापूर, डिंगोरे, ओतूर परिसरात चांगलाच पाऊस झाला. विशेष म्हणजे उत्तरेकडील वाऱ्याचा वेग जास्त असल्याने उन्हाळी हंगामातील बाजरी पीक जमिनीवर कोसळले. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.