भातरोपांच्या पेरणीसाठी उपयुक्त पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:03+5:302021-06-10T04:09:03+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील डिंभे-शिनोली परिसरा बरोबरच दुर्गम आहुपे , पाटण या खोऱ्यात आज सकाळपासून पावसाने चांगली हजेरी लावली ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील डिंभे-शिनोली परिसरा बरोबरच दुर्गम आहुपे , पाटण या खोऱ्यात आज सकाळपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. भीमाशंकर खोऱ्यातही पावसाने जोरदारा हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सध्या या भागात भातपेरणीची कामे सुरू असून ती अंतिम टप्पात आहेत. पाऊस लवकर होईल की नाही यामुळे काही शेतकऱ्यांनी भात पेरण्या थांबविल्या होत्या. मात्र, आज सकाळपासून पावसाची चिन्हे दिसताच उरल्यासुरल्या शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी लगभग केली होती. सुरू झालेला पाऊस हा पेरलेली भातरोपे उगवून येण्यासाठी चांगला आहे. भातपेरणीनंतर लगेचच पाऊस झाल्यास मातीतील प्रत्येक दाना ओलीला लागतो व तो उगवून येण्यास मदत होते. जंगलातील पक्षी अथवा किड्यामुंग्याकडून भात बियाण्याचे नुकसान होत नाही. व शेतकऱ्यांचे मोलामहागाचे बियाणे वाया जात नाही. पेरणीनंतर लगेचच आलेला पाऊस भातरोपे उगवून येण्यास मदत होतेच, मात्र ही रोपे लागवडीसाठी लवकर उपलब्ध होत असल्याने भातलागवडीही वेळेत उरकल्या जातात. त्यामुळे आज सकाळपासून सुरू असलेला पाऊस भातरोपांसाठी उपयुक्त मानला जात असून भातउत्पादक शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आज पावसाने हजेरी लावली असून सुरू असलेला पाऊस भातरोपे उगवून येण्यासाठी उपयुक्त मानला जात आहे.
.(छायाचित्र-कांताराम भवारी)