कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:59+5:302021-05-10T04:11:59+5:30
पुणे : पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ...
पुणे : पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भाच्या बऱ्याच भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. रविवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे पाऊस पडला.
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रासह विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र असल्याने पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. उद्या सोमवारी कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यात १० व ११ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस असून नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ मे रोजी पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.