पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; नाझरे धरण १०० टक्के तर चासकमान, भामा-आसखेड ६० टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:04 PM2020-08-16T19:04:58+5:302020-08-16T19:10:37+5:30
लवकरच दोन्ही धरणे भरणार, पाण्याचा प्रश्न मिटणार
पुणे: जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण रविवारी १०० टक्के भरले आहे. सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान धरणावरील २६ स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातुन सा क्युसेक पाण्याचा विसर्ग स्वयंचलित दरवाजातुन झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाझरे धरण शाखाधिकारी एस. जी.चौरंग यांनी दिलेला आहे .
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट ( पाऊण टीएमसी ) एवढी आहे.रविवारी ( दि. १५) १० वाजता धरण १०० टक्के भरले आहे.नारायणपूर,सासवड परिसरात मोठा पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात चौदा हजार क्युसेकने पाणी येत होते. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
आहे...................................................
५० गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार
बारामती व पुरंदर तालुक्यातील नाझरे,पारगांव - माळशिरस ,जेजुरी शहर, एमआयडीसी, मोरगांव प्रादेशिक या नळयोजनेवरील पन्नास गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाझरे धरण पूर्ण भरल्यामुळे मार्गी लागणार आहे. तर नाझरे ,जवळार्जुन , आंबी , मावडी , मोरगांव,जोगवडी येथे शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याचे आवर्तने मिळणार आहेत .
चासकमान: ८.५० टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ६०.५ टक्के म्हणजेच ५.५० टीएमसी भरले आहे. धरणक्षेत्रांत एकूण ५२८ मिलिमीटर तर मागील २४ तासांत ३ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. आठ टीएमसी क्षमता असलेले भामा-आसखेड धरण ६८.५८ टक्के भरले आहे. धरणात ५.७४ टीएमसी पाणीसाठा असून पाणलोट क्षेत्रात एकूण ५५१, तर मागील २४ तासांत २४ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.
भामनेर व भीमनेर खोऱ्यात विशेषत: चासकमान धरण, भामा-आसखेड धरणसाखळीत चांगला पाऊस आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिलयास पाण्याचा प्रश्न वर्षभर मिटणार आहे.
चासकमान धरणात भीमा नदीद्वारे रोज सहा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. तर भामा-आसखेड धरणात भामा खोऱ्यातून भामा-आसखेड धरणात दोन हजार क्युसेक वेगाने धरणात पाण्याची आवक होत आहे. संततधार पडत असलेल्या पावसाने आरळा नदी, भामा नदीबरोबरच भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या भातलागवडीवर परिणाम झाला होता. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला होता. परंतु धरण साखळीत पडत असलेल्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला आहे.
.......
शिरूर तालुक्यासाठी लवकरच आवर्तन
शिरूर तालुक्यातील शेती चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने असाच जर धरण साखळीत पाऊस बरसत राहिल्यास लवकरच शिरूर तालुक्यासाठी खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडले जाणार आहे.
........
आरळा नदीवर असलेले १.५१ टीएमसी क्षमता असलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्याद्वारे आरळा नदीमधून चासकमान धरणात पाण्याची आवक होत आहे.